Saturday 16 January, 2016

फुलपाखरू

    "मंगेश पाडगावकर " त्यांच्या कवितेच्या जगात निघून गेले, कायमचे . इहलोकीतून कवितेच्या दुनियेची सफर घडवून आणणारा एक पूल अचानक गायब झाला. तसे कवितेच्या दुनियेची सफर घडवणारे काही कमी लोकं नाहीत तरीपण ज्या सहजतेने आणि तरीपण उत्कटतेने पाडगावकर मुशाफिरी करायचे तसा दुसरा कवी सापडणे अवघड आहे. 
    
      जसे क्रिकेटच्या दुनियेत डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर , सचिन तेंडुलकर सारखे महान खेळाडू मिळाले पण एखाद्या पिढीच्या नशिबी एकच महान खेळाडू येतो. माझ्या नशिबी सचिन तेंडुलकर आला, तसा परत एखादा खेळाडू अनुभवण्यास मिळावा अशी इच्छा असते पण मिळेल का नाही हे नशीबावर अवलंबून असते. कवितेच्या दुनियेसाठी पाडगावकर माझे सचिन तेंडुलकर आहेत.

        अत्यंत उत्कटतेने निसर्गावर प्रेम केलेला आणि आपली निरीक्षणे चौकसपणे कवितेच्या चौकटीत बसवून लोकांपर्यंत पोहोचवणारा हा महान कवी माझा आदर्श होता. 

देणाऱ्याने देत जावे  घेणाऱ्याने घेत जावे 
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत 

या कवितेत निसर्ग आणि माणूस यांचे नाते ज्या प्रकारे जोडले आहे ते पाडगावकरच करू जाणे. 
त्यांच्या कवितेबद्दल जितके लिहावे तितके थोडेच. 

अजून एका कवितेत पाडगावकर लिहितात 

मित्रांनो आयुष्यात काय केवळ काटेरी डंख असतात 
डोळे उघडून बघा,सगळ्यांना फुलपाखराचे पंख असतात 

पाडगावकरांपासून प्रेरणा घेऊन पुढे लिहावसं वाटत 

रंगीबेरंगी फुलपाखरे असोत वा फुलपंखी स्वप्न असोत 
दोन्ही बघायला रम्यच असतात 
पण … जेंव्हा त्यांच्या मागे  धावून, त्यांना गवसणी घालायची असते 
भिरभिरत्या फुलपाखराला ओंजळीत 
अन  फुलपंखी स्वप्नांना प्रत्यक्षात आणायचे असते 
तेंव्हा दोन्ही कष्टसाध्यच असतात 
कष्ट करताना थकायला झाले तरी स्वप्न तोडायचं नसतं 
बागडणाऱ्या फुलपाखराला रागवून मारायचं नसतं 
प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर अन पुरेसा घाम गाळल्यावर 
फुलपाखरे स्वतः हातावर येउन बसतात  
अन तुमच्या  स्वप्नपूर्तीसाठी अनेक हात पुढे येतात 

- पिनाकिन कर्वे 
१६ जानेवारी २०१६